सरकारच्या निर्णयांना विरोधकांचा पाठिंबा   

पहलगाममधील हल्ल्याचा सर्वपक्षीय बैठकीत निषेध

नवी दिल्ली : पहलगाममध्ये नरसंहार घडविणार्‍यांना धडा शिकविण्यासाठी सरकारकडून जी पावले उचलली जातील, त्यास आमचा पाठिंबा असेल, असे विरोधी पक्षाने गुरूवारी सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता राहावी, यासाठी सरकारने पावले उचलावीत, असेही त्यांनी सांगितले. 
 
पहलगाममधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत हल्ल्याबाबतची माहिती देण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला दोन मिनिटांचे मौन पाळत हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच, पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. सुमारे दोन तास ही बैठक चालली.
 
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीस गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, राज्यसभेतील सभागृह नेते जे.पी. नड्डा, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (पवार  गट) सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी, बीजेडीचे सस्मित पात्रा, शिवसेनेचे (शिंदे गट) श्रीकांत शिंदे, ‘आप’चे संजय सिंह आदी उपस्थित होते.

सरकारने मान्य केली चूक...

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी गुप्तचर यंत्रणा आणि गृह मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी सुरक्षेत चूक झाली असल्याचे मान्य केले असल्याचे सांगितले. तसेच, चूक नेमकी कुठे झाली, हे आम्ही शोधून काढू. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल, असा विश्वासही व्यक्त केला.
 

Related Articles